आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोटचे वाटप

| खरोशी | प्रतिनिधी |

श्री विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट भांडुप, राष्ट्र सेवा दल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने म्हैसकोंड, पानेड, निंबारवाडी, खरबाची वाडी, काटीची वाडी, राजमाची वाडी ता. पेण, जिल्हा रायगड येथील सहा आदिवासी पाड्यांवर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रेनकोटचे वाटप कार्यक्रम नुकताच म्हैसकोंड ह्या आदिवासी पाड्यावर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट उपलब्ध करुन देण्यात आले.

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या गोष्टी सांगितल्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सदस्या सोनम कोपरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोट आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले. संस्था प्रत्येक वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप करीत असते. यावर्षी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या कविता पाटील, सुदाम सुतार आणि गोगादे केंद्राचे प्रमुख दत्ताराम कोठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या आदिवासी पाड्यांवरील शिक्षक सुवर्णा हंकारे, ओंकार पवार, मदन मुंगळे, उमेश गायकर, सुनील गोळे, नितीन जाधव, विक्रम गायकवाड, दिनकर भोईर यांनी मेहनत घेतली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version