। माणगाव । वार्ताहर ।
सामाजिक व शैक्षणिक कार्यात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव येथील उषःकाल फाऊंडेशन या सेवाभावी संघटनेतर्फे माणगाव तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले. उषःकाल फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे हे दरवर्षी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करीत असते. फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फाऊंडेशनतर्फे माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वारक, वारक आदिवासी वाडी, कुशेडे शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रजिस्टर वह्या वाटप करण्यात आले. शिवाय, सामाजिक सभागृह वारक व अंगणवाडी वारक येथे राष्ट्र पुरुषाच्या प्रतिमा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकार पोर्टचे विश्वस्त राजेश कुलकर्णी होते. तसेच उषःकाल प्रतिष्ठान संस्थापक विश्वस्त नामदेव शिंदे, शिक्षक मोरे गुरुजी, वंचित आघाडीचे प्रविण जाधव, नामदेव वाढवळ, विनोद, सखाराम शिंदे, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. उषःकाल फाऊंडेशन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, असे राजेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात बोलताना उषःकाल फाऊंडेशनचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी उषःकाल टीम व ग्रामस्थांनी सहकार्य केले.