आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

। नागोठणे । वार्ताहर ।

मुलं ही देवाघरची फुलं या संकल्पनेतून नागोठणे मित्र परिवार यांच्या वतीने गेली 10 वर्षे नागोठणे परिसरातील दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील नागोठण्याजवळील राजिप शाळा चेराठी आणि काळकाई या दुर्गम अशा शाळांतील आदिवासी ठाकूर समाजाच्या विद्यार्थ्यांना नागोठणे मित्र परिवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले वह्या, पेन व पेन्सिल या शैक्षणिक साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी नागोठणे मित्र परिवार ग्रुपचे ज्येेष्ठ सदस्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक उल्हास नागोठकर, पालीवाला महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे प्राध्यापक संतोष भोईर, ईजी वे स्पोकन इंग्लिश क्लासेस नागोठणेचे संचालक दिनेश खंडागळे, नाडसूर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक संदीप दरेकर, नागोठणे येथील भाजी व्यापारी शैलेश मांडवकर, वैष्णवी झेरॉक्सचे मालक सुधीर नागोठकर, नागोठणे परिसरातील प्रसिद्ध मृदुंगमणी संजय तळेकर, वासगाव गावचे शिक्षक खेळू हंबीर,आबा कुंभार आदी उपस्थित होते.

Exit mobile version