गिरणेमध्ये जॉबकार्डचे वाटप

। तळा । वार्ताहर ।
रोजगार अभावी ग्रामीण भागातील जनतेचे वाढते स्थलांतर थांबावे, त्याकरता केंद्र आणि राज्य शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अमलांत आणली आहे. या योजनेमध्ये ज्या कुटुंबाने किंवा व्यक्तीने रोजगाराची मागणी केली त्याला वर्षाकाठी शंभर दिवस रोजगार देण्याची हमी सदर योजनेत देण्यात आलेली आहे. गिरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती पायगुडे यांनी रोजगार हमी योजनेचे महत्व सर्व सामान्यांना पटवून 160 जॉब कार्डचे वाटप केले. थेट ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगा अंतर्गत कामांना सुरुवात करावी, असे आवाहन सरपंच ज्योती पायगुडे यांनी केले आहे. वैयक्तिक सिंचन विहीर, शेततळे, जनावरांचा गोठा, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, वैयक्तिक शौचालय, शोष खड्डा, रेशीम लागवड, वैयक्तिक वृक्ष लागवड, फळबाग लागवड, ढाळीचे बांध, घरकुल नाडेप खत टाके, गांडूळ खत टाके, विहीर पुनर्भरण अशा प्रकारच्या कामांना शासनाने मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. थेट ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगा अंतर्गत कामांना सुरुवात करावी. – ज्योती पायगुडे, गिरणे ग्रामपंचायत सरपंच.

Exit mobile version