पढेगा अलिबाग, तो बढेगा अलिबाग


शेकापचा स्तुत्य उपक्रम
गरजु विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढल्याने त्यासाठी लागणार्‍या मोबाईल आणि टॅबचीदेखील मागणी वाढली. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असतानाच विद्यार्थ्यांना टॅब घेऊन देणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये, याकरिता शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेत टॅब वाटप मोहीम हाती घेतली. याच पार्श्‍वभूमीवर अलिबाग नगरपरिषदेच्या हद्दीतील 100 गरजू विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 4) शेकाप कार्यालयात टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकाप गटनेते प्रदीप नाईक यांनी या उपक्रमाची माहिती दिली व शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख तथा अलिबाग नगरपरिषद नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शेकापक्षाला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांची जाणीव आहे. समाजातील प्रत्येक गटातील मुले शिकून पुढे आली पाहिजेत. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. डिजिटल मीडिया, मोबाईल, टॅब या प्रत्येक गोष्टीच्या वापराला दोन बाजू आहेत; कारण त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो. त्याचा सकारात्मक उपयोग केला तर ज्ञानाचे महाद्वार निश्‍चितपणे उघडेल. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करावी, तसेच भविष्यात तुम्ही केलेल्या कार्याची माहिती आम्हाला द्यावी. जेणेकरुन तुमच्या यशात आम्हीदेखील सहभागी होऊ. त्यावेळी लाल बावट्याला विसरु नका, अशी अपेक्षा चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली.
यापुढे मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, शिक्षण हे शेकापक्षात रुजलेले आहे. या तालुक्यात प्रत्येक शाळेचा दगड उलटला तर तिथे भाऊ प्रभाकर पाटील यांचेच नाव दिसेल. तुमच्याकडे जर शिक्षण असेल, तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरीही अडचण येणार नाही. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शेकापने आतापर्यंत जवळपास साडेसात हजार मुलींना सायकल वाटप केले आहे. संपूर्ण राज्यात एक लाख मुलींना सायकल वाटप करायचा मानस आहे. शिक्षणाच्या सर्व मदतीसाठी शेकापचे सर्व नगरसेवक तत्पर असतील. शिक्षणासाठी कोणीही तुम्हाला पक्ष विचारणार नाही. शेकाप हा मुलांना कला व क्रीडा क्षेत्रासाठीदेखील तितकेच प्रोत्साहन देतो. त्यासाठी स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्स व नाट्यगृह उपलब्ध करुन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून अलिबाग शहरात भरपूर विकासकामे करण्यात आली आहेत. कोरोना काळात प्रशांत नाईक आणि त्यांच्या टीमने देवदूत बनून काम केले आहे, हे जनता कधीही विसरणार नाही.
यावेळी नगरसेवक गौतम पाटील, अनिल चोपडा, अजय झुंझारराव, राकेश चौलकर, नगरसेविका वृषाली ठोसर, संजना किर, अश्‍विनी पाटील, नईमा सय्यद, प्रिया वेलकर, राजश्री पेरेकर, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोव्हिड काळात शेकापने घरामध्ये न बसता लोकांपर्यंत पोहचून त्यांना मदतकार्य केले आहे. शेतकरी कामगार पक्ष हा केवळ राजकारणासाठी काम करत नाही, तर तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून काम करणारा पक्ष आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने शेकापने हे पाऊल घेतले आहे. या टॅबचा विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने उपयोग होईल.
प्रदीप नाईक, शेकाप गटनेते


यापूर्वी टॅब किंवा मोबाईल नव्हता. मात्र, आता तो मिळाल्यामुळे ऑनलाईन क्लास करणे सोपे होणार आहे. यापूर्वी टॅब नसल्यामुळे नवीन गोष्टी शिकणे शक्य नव्हते. मात्र, आता ते शक्य आहे. त्यामुळे शेकाप व चित्रलेखा पाटील यांचे आभार.
प्राची ढोरे, विद्यार्थिनी, इयत्ता 9वी

Exit mobile version