सिप्ला फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना टॅबचे वाटप

। खोपोली । प्रतिनिधी ।
सिप्ला फाऊंडेशन, रसायनी-पाताळगंगा व आय ड्रीम एज्युकेशन गुरुग्राम यांच्या माध्यमातून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौकमधील इयत्ता दहावीच्या 179 विद्यार्थ्यांना आणि दहा शिक्षकांना शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात होते. ही समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकरिता त्याचे वाटप करण्यात आले. सिप्ला फाऊंडेशनचे उल्का धुरी, सुनील मकरे, ड्रीम एज्युकेशन गुरुग्रामचे सोमेश व सूरज गोंडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर. भोमले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या उल्का धुरी यांनी आपल्या मनोगतात या टॅबमुळे विद्यार्थ्यांची नक्कीच उत्तम शैक्षणिक प्रगती होईल, असा आशावाद व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी टॅबमध्ये खूप सोप्या सुलभ पद्धतीने अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आला आहे. या टॅबचा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामासाठीच वापर करावा, असे त्यांनी सांगितले. सुनील मकरे यांनी विद्यार्थ्यांनी टॅबची देखभाल कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. आय ड्रीम एज्युकेशन गुरुग्रामचे सोमेश व सूरज गोंडगे यांनी दोन दिवस विद्यार्थ्यांना टॅबच्या साह्याने अभ्यास कसा करावा याचे शिक्षण दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनी सिप्ला फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा, संचालक कॅप्टन विठ्ठलराव कदम, संचालक सुलभा गायकवाड, संचालक नारायण आंबवणे, सारंग शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पंडित पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका पुजारी, पर्यवेक्षक मोळीक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कुंभार यांनी केले.

Exit mobile version