अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे व त्यांच्या पथकाने देवेन जितेंद्र मेहता यांच्या अनधिकृत बंगल्याची वाडी व अनधिकृत बांधकाम नष्ट करण्याची कारवाई केली.
मौजे सतिर्जे, ता.अलिबाग येथील गट नंबर 133/5 व 133/7 या मिळकतीत टेकडी खोदून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने मौजे सतिर्जे येथील 133/5 व 133/7 मधील बांधकामांची मोजमापे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांच्यामार्फत घेण्यात आली. तेव्हा बांधकाम परवानगीपेक्षा वाढीव अनधिकृत बांधकाम केल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्याचप्रमाणे बांधकाम परवानगी हॉर्टीकल्चर प्रोजेक्ट या वाणिज्य कारणासाठी असताना सद्य:स्थितीत याचा वापर प्रत्यक्षात मात्र रहिवासी कारणासाठी केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
वाढीव अनधिकृत बांधकाम व वापरात बदल केल्यामुळे बांधकामधारक देवेन जितेंद्र मेहता यांना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडील दि.1 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये वाढीव अनधिकृत बांधकाम 30 दिवसांच्या आत स्वतःहून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र श्री.देवेन मेहता यांनी दिलेल्या मुदतीत वाढीव बांधकाम स्वतःहून काढून न टाकल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार दि.10 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे व त्यांच्या पथकाने देवेन जितेंद्र मेहता यांच्या बंगल्याची वाडी व अनधिकृत बांधकाम नष्ट करण्याची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.