बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज
| रायगड | प्रतिनिधी |
दि.19 एप्रिल रोजी येणारी अक्षय्य तृतीया ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केले जात असल्याने बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर तालुका स्तरावरील अधिकारी ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह घडता कामा नये. यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स तसेच पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे किमान वय 21 वर्षे असणे बंधनकारक आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच शाळांचे मुख्याध्यापक यांनी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर कुठे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग किंवा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.
रायगड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक असून, आपल्या परिसरात असा प्रकार आढळल्यास त्वरित माहिती द्यावी, जेणेकरून बालकांचे भवितव्य सुरक्षित राहील आणि कोणतीही अघटित घटना टाळता येईल.
किशन जावळे,
जिल्हाधिकारी
