| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे बालविवाह रोखण्यास यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फणसवाडी या गावात वाघमारे कुटुंबियांत बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरिक्षक कुदळे, पोलीस उपनिरीक्षक फड व प्रदीप पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन बैठक घेतली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सदाशिव लवते, पोलीस पाटील प्रविण पाटील, सरपंच संजय घरत, आशा सेविका यांच्यासह वाघमारे कुटुंबियांना व गावातील स्त्री-पुरुषांना या बैठकीला बोलावले होते. या सर्वांची बैठक घेऊन त्यांना बालविवाहबाबत माहिती देण्यात आली. तसेच, त्यांचे बालविवाह रोखण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.





