सिद्धिप्रभा, गुड मॉर्निंग स्पोर्टस् विजेते
| मुंबई | वृत्तसंस्था |
सिद्धिप्रभा फाऊंडेशन, गुड मॉर्निंग स्पोर्टस् यांनी कुमार गटात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात अनुक्रमे पश्चिम व पूर्व विभागात विजेतेपद पटकाविले.
मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरु असलेल्या पश्चिम विभागातील कुमारांच्या अंतिम सामन्यात सिद्धिप्रभा फाऊंडेशनने विजय क्लबला 39-26 असा पराभव करीत स्व. द्रौपदी मारूती जाधव चषक पहिल्यांदा आपल्या नावे केला. आक्रमक सुरुवात करीत सिद्धीप्रभाने विश्रांतीला 20-11 अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. विश्रांतीनंतर आपला खेळ कायम ठेवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सिद्धार्थ भोसले, आदित्य इंगळे यांच्या चढाई पकडीच्या चौफेर खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शिवम यादव, आर्यन यांचा खेळ विजय क्लबला मिळवून देण्यात कमी पडला.

पूर्व विभागात कुमारांच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने पूर्वार्धातील पिछाडीवरुन साऊथ कॅनराचा प्रतिकार 46-28 असा मोडून काढत स्व. सौ. द्रौपदी मारूती जाधव चषक आपल्याकडे खेचून आणला. पूर्वार्धात साऊथ कॅनराच्या चिराग लिमकर, अभिजित चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळ करीत संघाला 2 गुणांची आघाडी दिली होती. पण उत्तरार्धात दिनेश गवळी, श्रवण तिरोडकर यांनी चढाई पकडीचा तुफानी खेळ करीत संघाला 18 गुणांच्या फरकाने विजेतेपद मिळवून दिले.
पूर्व विभागात किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात शताब्दी स्पोर्टस्ने पहिल्या डावातील 18-24 अशा 6 गुणांच्या पिछाडीवरून श्री स्वामी समर्थ मंडळाचे आव्हान 58-37 असे परतवीत जेते पदावर आपले नाव कोरले. दुसऱ्या डावात सूर सापडलेल्या रूपाली साव, विनया वाळुंज यांनी झंझावाती चढाया करीत हा विजय मिळविला. त्यांना शालू यादव हिची पकडीची उत्तम साथ लाभली. अनन्या शिंदे, कस्तुरी कोकाटे, नियती खाबे यांनी पहिल्या डावात उत्कृष्ट खेळ करीत संघाला आघाडी दिली होती. दुसऱ्या डावात मात्र त्यांचा खेळ ढेपाळला. पश्चिम विभागाच्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात अमरहिंद मंडळाने भारतमाताचा पराभव करीत विजेतेपद पटकविले. साईजा पेडणेकर, वेदिका तिर्लॉटकर यांच्या चतुरस्त्र खेळाने अमरहिंदने विश्रांतीला भक्कम आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर भारतमाताच्या पायला कांचन, तन्वी काणेकर यांनी जोशपूर्ण खेळ करीत सामना रंगतदार अवस्थेत नेला. पण संघाला जेतेपद मिळवून देण्यात त्या कमी पडल्या.






