। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण तसेच हर घर तिरंगा अभियान यशस्वी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. या दोन्ही उपक्रमाबाबत ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध सुचना केल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तहसिलदार विशाल दौंडकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल तसेच आठवडी बाजार या ठिकाणी तसेच गणेशोत्सवादरम्यान सर्व गावागावांमध्ये गणेश मंडळांच्या सहकार्याने विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा / मनपा / तालुका / प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कॉल सेंटर मार्फत दुसरा डोस व प्रिकॉशनरी डोस राहिलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लस घेण्याबाबत प्रवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर म्हणाले की, केंद्र शासनाने कोविड-19 प्रिकॉशनरी डोस घेण्याचा कालावधी 06 महिने इतका करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातही सर्व नागरिकांना प्रिकॉशनरी डोस घेण्याविषयी विविध माध्यमातून जनजागृती करावी व त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे म्हणाले की, जिल्ह्यात दरदिवशी जवळपास 6 ते 7 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून ही संख्या पुढील कालावधीत आणखी वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यास आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर आहे.
या बैठकीत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत ध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन करण्यात यावे. तसेच विविध माध्यमातून हर घर तिरंगा या उपक्रमाची अधिकाधिक प्रसिद्धी करण्यात यावी व हा उपक्रम यशस्वी करावा असेही सांगण्यात आले.