। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सुत्र हाती घेतल्या नंतर अवघ्या दुसर्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूर आणि दरडग्रस्त भागाची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान घडलेले नुकसान, नागरिकांच्या अडचणी, आतापर्यंत पोहचलेले मदतकार्य, प्रशासनाने केलेल्या तथा भविष्यात कराव्या लागणार्या उपाययोजना यांची माहिती घेतली. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देत प्रशासन यथायोग्य उपाययोजना राबवतील, असा विश्वासही दिला. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर हे एक अनुभवी प्रशासक म्हणून ओळखले जातात. जिल्हाधिकारी म्हणून सुत्र हाती घेतल्याघेतल्या त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीची तथा प्रशासकीय अनुभवाची झलक दाखवून दिली आहे. त्यांच्या या पाहणीदौराचे जनसामान्यांकडून कौतुक होत असून जिल्हाधिकारी म्हणून त्यांची भूमिका कशी राहिल, याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसीलदार सुरेश काशिद, पोलादपूर तहसीलदार समीर देसाई, गटविकास अधिकारी वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी गुलाबराव सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.