जिल्हा न्यायालयाचे कामकाज होणार पेपरलेस

न्यायालयात ई-फायलिंग सुविधा सुरू

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग प्रणालीद्वारे कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होणार असून, विधिज्ञ व पक्षकार यांना घरबसल्या प्रकरणे न्यायालयात दाखल करता येणार आहेत. सध्या यासाठी लहान प्रकरणे दाखल करण्याची प्रक्रिया होणार असून, नंतर मात्र याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. सोमवारी ई-फायलिंग सेंटरचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, एआयआर व्हीजन इन्फिनिटी प्रा.लि. यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनतर्फे हे ई-फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कर्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी केले. खजिनदार ॲड. राजेंद्र माळी यांनी आभार मानले. तर, ॲड. अमित देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांच्यासह सर्व न्यायाधीश वर्ग, रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ॲड. अनंत पाटील, सचिव तथा रायगड जिल्हा ई-फायलिंग प्रमुख ॲड. अमित देशमुख, खजिनदार ॲड. राजेंद्र माळी, बार असोसिएशनचे इतर पदाधिकारी, सदस्य, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा न्यायालयात वकिलांसाठी ई-फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील हे पहिले ई-फायलिंग सेंटर आहे. रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनने ई-लायब्ररीनंतर उपलब्ध करुन दिलेली ई-फायलिंग सेंटर ही मोठी सुविधा आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वकिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

ए.एस. राजंदेकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
Exit mobile version