जिल्हा रुग्णालयाचा दिव्यांगांना मदतीचा हात

एका दिवसात दिव्यांग प्रमाणपत्राचे नूतनीकरण
। माथेरान । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरानमधील दिव्यांग बांधवांना जिल्हा रुग्णालयाकडून मदतीचा हात देण्यात आला. दिव्यांगाचे प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दिव्यांग बांधवांना ताटकळत न ठेवता कागदपत्रे पूर्ण असलेल्यांना त्वरित मदत करून पूर्ण सहकार्य केले. या दिव्यांग बांधवांसाठी माजी नगरसेवक तथा माथेरान दिव्यांग संस्था अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घेतला होता.
प्रमाणपत्रांची मुदत संपल्याने त्यांचे नूतनीकरण करण्याकरिता येथील दिव्यांग बांधवांना दि.27 रोजी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेले. यामध्ये एकूण 18 दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण झाले. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार संगणक प्रणालीद्वारे हे नूतनीकरण करण्यात आले. तसेच सोबत यूडीआयडीआय हे ओळखपत्रसुद्धा वितरित केले गेले. या ओळख पत्रामुळे दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व सवलती मिळणार आहेत. यामध्ये त्यांचे एसटी प्रवास, लोकल प्रवास सवलती दरात होणार आहेत. आता जे काही उर्वरित दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचे राहिले आहे. त्यांना यापुढे काही दिवसांनी टप्प्याटप्प्याने अलिबाग येथे घेऊन जाण्यात येईल, असे यावेळी अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
येथील दिव्यांग बांधवांना अलिबाग येथे घेऊन जाण्याकरिता येथील पालिका प्रशासक मुख्याधिकारी सुरेखा भणगे, त्याचबरोबर येथील काही दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, डॉ. फडतरे, डॉ. वैभव पवार व समाधान चौधरी यांचेदेखील विशेष सहकार्य मिळाले. असेसुद्धा माथेरान दिव्यांग बांधव अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version