जिल्हा ग्रंथालय संघाची सभा उत्साहात

ॲड.डॉ. गौतम पाटील यांचा गौरव

| म्हसळा | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा अलिबाग येथील सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, संचालक आणि ग्रंथपाल यांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सभेत ग्रंथालय चळवळीला बळ देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सभेच्या प्रारंभी सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ॲड. डॉ. गौतम पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नुकत्याच थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या 36 व्या वर्ल्ड स्कूल समिट मध्ये त्यांना “आऊटस्टँडिंग एज्युकेशन ॲडमिनिस्टेटर” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी योगदानाची दखल घेत मेरीलँड स्टेट युनिव्हर्सिटी, यू.एस.ए. यांनी त्यांना “डॉक्टर ऑफ फिलॉसॉपी इन एज्युकेशन” ही मानद पदवी बहाल केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांच्या हस्ते ॲड. डॉ. गौतम पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघाच्या उपाध्यक्षा शैलाताई पाटील, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ज्येष्ठ संचालक संजय खांबेटे, दयानंद भगत, रजिता माळवी, जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी ममता रोगे तसेच सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version