मिनिडोअर संघटनेची जिल्हाभर निदर्शने

अलिबामध्ये विजय पाटील, दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील चार चाकी-सहा आसनी टॅक्सी चालकांच्या विविध प्रलंबित समस्यांसाठी मिनिडोअर संघटनेची निदर्शने करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील आणि जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनला देण्यात आले.
यावेळी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, रायगड जिल्ह्यातील बहुतांशी टॅक्सी चालक हा सुशिक्षित बेरोजगार तरूण असून, प्रवासी सेवा देऊन
आपल्या कुटुंबाची उपजीविका करत आहे. त्यात गेल्या वर्षापासून कोरोना या महामारीमुळे आमचा संपूर्ण व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश शासनाने दिल्याप्रमाणे बंद होता. त्यात आजपर्यंत लाकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ, महापूर, दिवसेंदिवस वाढत चाललेले डिझेलचे दर, मेटेनन्स खर्च तसेच कोरोनामुळे प्रवासी संख्येत झालेली प्रचंड घट यामुळे नुकसान होऊन अगोदरच मेटाकुटीला आलेला आमचा मिनिडोअर, टाटा मॅजिक टॅक्सी चालक-मालक हा शासनाने वरील वस्तुस्थितीचा विचार न करता मुंबई शहराप्रमाणे अविकसनशील नियम ग्रामीण भागातील वाहनांना लागू केल्यास 70 टक्के वाहने स्क्रॅप होऊन चालक-मालक उद्ध्वस्त होतील, हे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
मुंबईसारख्या प्रगत शहरात उपलब्ध असणारे रस्ते सुविधा व्यवसायाच्या दृष्टीने मुबलक प्रवासी संख्या दोन पाळीत व्यवसाय करणे शक्य आहे. तसेच मुंबईमध्ये टॅक्सी/ ऑटो मधून होणारे गुन्हे ह्या प्रमुख गोष्टींचा विचार करत रायगड जिल्ह्यातील ही परिस्थिती वेगळी आहे. येथे रस्ते खराब आहेत, ग्रामीण व दुर्गम भागात प्रवासी सेवा, बहुतांशी गरीव व मोलमजुरी करणारे प्रवासी, एकच पाळीत होणारा व्यवसाय त्यातदेखील दोन तासाने येणारा नंबर ह्यामुळे दिवसाला जास्तीत जास्त 300 ते 400 रूपये अल्प उत्पन्न मिळते. मुंबई सारखे ऑटो/ टॅक्सीसाठी असलेले नियम हे अविकसनशील तसेच बहुतांशी ग्रामीण भागाला लावणे हे वस्तुस्थितीला धरून नाही व हे आमच्या रायगड जिल्ह्यातील चालक-मालकांवर अन्याय आहे. तरी आमच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Exit mobile version