। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जनआंदोलन हे मुख्यत्वे जनतेच्या हितासाठी केले जाते. त्यात शासकीय किंवा खासगी मालमत्तेला हानी न पोहचवता केल्यास ते आंदोलन नक्कीच सर्वमान्य ठरते. 2017 मध्ये रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्या सुरक्षित मार्ग जनआंदोलन समितीचे अध्यक्ष दिलीप भोईर आणि त्यांच्यासह 11 जणांची सोमवारी जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
अलिबाग-चोंढी मार्गे रेवस रस्त्यावर आज जो सुखकर प्रवास होत आहे, त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समिती सभापती तथा अलिबाग रेवस मिनिडोअर चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार आंदोलन केले. तसेच जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधून घेतले. प्रसंगी स्वतःवर गुन्हे दाखल झाले, पण रस्त्यासाठीचा लढा निर्धाराने लढले.अलिबाग- रेवस रस्त्याच्या नुतनीकरणासाठी दिलीप भोईर यांनी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून 2013 पासून लढा दिला. प्रसंगी स्वखर्चाने या जीवघेण्या खड्यांवर माती टाकून ते भरले. बांधकाम विभाग तात्पुरती डागडुजी करून जनतेला फसवीत होते. शेवटी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेऊन सुरक्षित मार्ग जनआंदोलन समितीची स्थापना केली.
या समितीमध्ये परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांना सामील होण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. 21 एप्रिल 2017 रोजी दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली वायशेत येथे आरसीएफ गेटसमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी घेऊन तात्काळ अलिबाग- रेवस रस्त्याच्या नूतनीकरणाचे लेखी आश्वासन दिले.
दरम्यान या रास्तारोको आंदोलन प्रकरणी सुरक्षित मार्ग जनआंदोलन समितीच्या 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समिती सभापती तथा जनआंदोलन समितीचे प्रमुख दिलीप भोईर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, लायन्स क्लबचे आमिष शिरगावकर, सासवणे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सुष्मीत घरत, तत्कालीन आगरसुरे ग्रामपंचायत सरपंच मनस्वी भोईर, जगदीश म्हात्रे, मापगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य विजय भगत, आवास ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य राजन वाकडे, किहीमचे माजी उपसरपंच आदिक नार्वेकर, मिनिडोअर चालक- मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक म्हात्रे, ऋषिकेश पडवळ, वंदेमातरम ग्रुपचे सागर पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मे 2017 मध्ये पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मुख्य न्याय दंडाधिकारी मोहिते यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. जनआंदोलन समितीच्या वतीने अॅड. मानसी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. मंजिरी सावंत-तळेकर यांनी काम पाहिले. दरम्यान सोमवारी मुख्य न्याय दंडाधिकारी मोहिते यांनी दिलीप भोईरासह 11 जणांची निर्दोष मुक्तता केली. जनआंदोलन समितीचे दिलीप भोईर यांनी या निकालानंतर समाधान व्यक्त केले. जनतेसाठी रस्त्यावर उतरलो, रस्ता झाला, प्रवाशांचा प्रवास देखील विना खड्याचा होतोय. याचे देखील समाधान व्यक्त केले.