दिवेआगरला पुन्हा येणार सुवर्णदिन

सुवर्णगणेश मुर्तीची अंगारकीला पुनर्प्रतिष्ठापना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
दिघी | गणेश प्रभाळे |
कोकणातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना मंगळवारी (23 नोव्हेंबर) अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी होणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध सुवर्णकार पु.ना. गाडगीळ यांच्याकडे श्री सुवर्ण गणेश मूर्तीची पुनर्निमितीचे काम सुरु आहे. श्री गणेश मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापना उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सन 1997 साली दिवेआगर येथे श्री गणेश मूर्ती सापडली. मात्र मार्च 2012 मध्ये मंदिरावर दरोडा पडून मूर्तीची चोरी करण्यात आली. संपूर्ण न्याय प्रक्रियेनंतर त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर सुवर्ण गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. संपूर्ण परिसरात आनंदाच वातावरण तयार झाले आहे. दिवेआगर मधील वैभव पुन्हा प्राप्त होणार असल्याने आता पर्यटकाच्या संख्येत देखील वाढ होणार आहे.
2 लाख पर्यटक
दिवाळी निमित्त दिवेआगर या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला तब्बल 40 हजारहून अधिक वाहनांची नोंद झाली आहे. यातून जवळजवळ 2 लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.
पुढील विकासाची दिशा
श्री सुवर्ण गणेश मंदिर रस्ता डांबरीकरण, बसस्थानक निवारा शेड, नागरी सुविधा अंतर्गत तळाणी रस्ता, रोजगार निर्मितीसाठी समुद्रकिनारी चार गाळे उभारणी यातील काही कामे सुरू असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले आहे.
समुद्रापासून गावचे संरक्षण
समुद्रापासून गावाचे संरक्षण होईल यासाठी धूप प्रतिबंधक बंधार्‍याचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत 5 कोटी मंजूर निधीतून काम सुरू आहे. पुढे दोन टप्प्यात प्रस्तावित मागणी नुसार संरक्षण भिंत पूर्ण होईल. यामध्ये पहिल्यांदा 5 कोटी तर दुसर्‍या टप्प्यात 2.50 कोटी मंजूर होऊन काम पूर्ण होईल.
सुवर्ण गणेश मंदिराची सुरक्षा
मूर्तीसाठी लॉकर हा सेन्सरमध्ये एक आधुनिक पध्दतीने बसणार आहे. मूर्ती संरक्षणसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. सध्या मंदिराच्या चार ही बाजुंनी संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे.

दिवेआगरमध्ये विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक कामे होत आहेत. सद्या सोलर सिस्टीमने गावात पथदिवे बसवण्यात येत आहेत. पुढे संपूर्ण गावातील रस्त्यांवर पथदिवे बसवण्यासाठी प्रयत्न असून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील.
उदय बापट, सरपंच दिवेआगर.

Exit mobile version