अंजप आणि बोरिवली ग्रामपंचायतींची निर्मिती
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रुप ग्रामपंचायतचे विभाजन करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतच्या आता दोन नवीन ग्रामपंचायती बनल्या आहेत. आता कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायती यांची संख्या 55 झाली असून, बोरिवली ग्रामपंचायतचे विभाजन होऊन अंजप ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे.
तालुक्यातील बोरिवली ही ग्रुप ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समजली जायची. अंजप, अंथराट, गुडवण, बोरिवली, सुगवे, नालधे ही गावे आणि सात आदिवासी वाड्यांची ही ग्रामपंचायत होती. या ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन होण्याबाबतची अनेक वर्षे चर्चा सुरु होती. शेवटी ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार बोरिवली ग्रामपंचायत बरखास्त करून बोरिवली आणि अंजप अशा दोन ग्रामपंचायती यांची निर्मिती केली गेली आहे.
नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या अंजप या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अंजप, आंत्राट ही गावे आणि काही आदिवासी वाड्या यांचा समावेश असणार आहे. तर बोरिवली ग्रामपंचायतीमध्ये बोरिवली, सुगवे, गुडवण आणि नालधे अशी चार गावे तसेच पाच आदिवासी वाड्यांचा समावेश असणार आहे. मावळत्या सरपंच वृषाली क्षीरसागर या अखंड बोरिवली ग्रुप ग्रामपंचायत मधील शेवटच्या सरपंच ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतचे विभाजन व्हावे यासाठी प्रामुख्याने अंजप गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.