| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात ठाणे विभागीय सहसंचालक शिवाजी आमले यांनी तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील, कृषी पर्यवेक्षक शुभम गटकळ, मंडळ अधिकारी शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक सुषमा गायकवाड, कृषी सहाय्यक सुरज घरत या सर्वांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील गावांना नुकतीच भेट देऊन, शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी करून घेतली. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण तृणधान्य अभियानांतर्गत चारसुत्री पद्धतीने घेतलेल्या रत्नागिरी आठ या भात लागवड प्रात्यक्षिकाची पाहणी केली. दरम्यान, मौजे चिरनेर येथे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून या गटातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या सेंद्रिय निविष्ठांची तसेच सेंद्रिय निविष्ठांचा वापर केलेल्या पिकांची प्रात्यक्षिके पाहिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी घेतलेल्या विविध पिकांविषयी माहिती व नवीन कृषी समृद्धी योजनांची माहिती तसेच अपुरे भांडवल व तंत्रज्ञान, कौशल्याचा अभाव, बाजारपेठेची मर्यादा, रोजगाराची निर्मिती व सामूहिक विकास याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले.







