दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार

। जयपूर । वृत्तसंस्था ।
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तिच्या गुप्तांगावर धारदार वस्तूने वार केले आहेत. तसेच तिला एका उड्डाणपुलावरून खाली फेकून दिले. राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात ही बलात्काराची घटना घडली आहे.
तिजारा उड्डाणपुलाखाली एक दिव्यांग 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यानंतर पीडितेला अलवर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगातून वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न अयशस्वी झाले. यानंतर तिला जयपूरच्या जे. के. लोन रुग्णलायत बुधवारी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी जवळपास अडीच तास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता मुलगी धोक्याबाहेर असल्याचे मंत्री परसदी लाल मीना यांनी एनआयला सांगितले.
मुलीच्या गुप्तांगामध्ये धारदार वस्तू टाकल्याने तिच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली. तिच्या गुप्तांगाला अधिक जखमा झाल्या आहेत. सध्या तिच्यावर लोन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टर मुलीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, असं लोन रुग्णालयाचे डॉक्टर अरविंद शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, आरोपी फरार असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले असून कुठलाही पुरावा आढळून आला नाही.
याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असं मंत्री मीना म्हणाले. तसेच राजस्थानच्या महिला आणि बालविकास मंत्री ममता भूपेश यांनी दोषींना लवकरच पकडले जाईल, असे आश्‍वासन दिले.
ममता भूपेश यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना 6 लाख रुपयांची भरपाईही जाहीर केली. 6 लाखांपैकी 5 लाख रुपये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तर 1 लाख रुपये महिला व बालविकास मंत्रालयाने दिले आहेत. सामाजिक न्याय मंत्री टिकाराम जुली यांनीही अलवरमधील पीडितेच्या कुटुंबीयांना 3.5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

Exit mobile version