राज्यातील वंचितांची दिवाळी अनुदानाविना कडू

रोहा | प्रतिनिधी |
सामाजिक न्याय विभागामार्फत समाजातील विधवा ,परित्यक्ता स्त्रिया,अपंग,निराधार आणि वंचित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. शासनाकडून मिळणार्‍या तुटपुंज्या अर्थ सहाय्यावर अनेकांची कशीबशी गुजराण होत असते.पण जुलै महिन्यापासून या योजनेतील लाभार्थ्यांना देय असलेले आर्थिक लाभ राज्य शासनाकडून अद्याप देण्यात आलेले नाहीत.यामुळे आम्हा वंचितांची दिवाळी काळी झाली असल्याची प्रतिक्रिया रोहा तालुक्यातील या योजनांच्या लाभार्थ्यांनी दिली आहे.
स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक असणारे राज्यातील लोकप्रतिनिधी निराधार ,अपंग,विधवा यांना देय असणार्‍या लाभांबाबत मात्र पुरेसे जागरूक नसल्याने सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे लाभार्थी मागील चार महिन्यांपासून लाभापासून वंचित आहेत.दिवाळीच्या सणात प्रशासनातील अधिकारी ते कर्मचारी ,सर्व लोकप्रतिनिधी यांना भेटवस्तू ,बोनस,पगार हे लाभ मिळाले.पण राज्यातील वंचितांना मात्र त्यांना देय असलेले लाभ महाविकास आघाडीच्या सरकारने दिवाळीपूर्वी न दिल्याने त्यांची दिवाळी मात्र कडू झाली आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी वेळ आहे.पण विधवा ,परित्यक्ता ,अपंग ,वृद्ध यांना देय असलेले लाभ देण्यास वेळ नाही असेच दिसून येत असल्याने सामान्य नागरिक महाविकास आघाडी सरकारच्या नावाने शिमगा करत आहेत.
पुढील आठ दिवसांत सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा न केल्यास शेकापच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शेकाप नेते पंडित पाटील यांनी दिला आहे.

Exit mobile version