चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अलिबाग नगरपरिषदेच्या पटांगणात शुक्रवारी (दि.30) शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्वीनी ठोसर, निवेदिता वाघमारे, संध्या पालवणकर, योजना पाटील, वृषाली भगत, पाणी सभापती अनिल चोपडा, जमाल सय्यद, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पुजा साळुंखे, नगरपरिषदेच्या विविध विभागातील सभापती, नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त नागरिकांना एका छताखाली खरेदी करण्याची संधी मिळावी, यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिवाळी फेस्टीवलचे आयोजन केले आहे. या फेस्टीवलमध्ये खाद्य पदार्थांसह सुगंधीत पदार्थ, पिशव्या, फराळ, वेगवेगळ्या रंगाचे कपडे, अलंकरा, घरगूती उत्पादने, रांगोळीसह रांगोळीचे साहित्य अशा विविध वस्तूंचे 20 स्टॉल आहेत. हा उपक्रम महिला बचत गटातील महिलांना आर्थिक बळ मिळावे तसेच रोजगाराचे साधन खुले व्हावे, यासाठी राबविण्यात आला आहे.
फेस्टीवलची चळवळ वेगळ्या उंचीवरः चित्रलेखा पाटील
महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांनी दिवाळी फेस्टीवलची सुरुवात केली. या फेस्टीवलमधून त्यांनी अलिबागकरांना विविध वस्तू व खाद्य पदार्थ खरेदी करण्याची संधी एका छताखाली देण्याचे काम केले. हाच वारसा विद्यमान नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण सभापती आणि त्यांची टीम जपण्याचे कार्य करत आहे. तसेच, या उपक्रमासाठी अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आणि माजी नगरसेविका वृषाली ठोसर यांची मोलाची साथ मिळत आहे. स्थानिक महिला उद्योजक, व्यावसायिकांना रोजगाराचे दालन खुले व्हावे, चुल व मुल या पलिकडे जाऊन महिला पुढे याव्यात, यासाठी सुरू केलेली दिवाळी फेस्टीवलची चळवळ आज वेगळ्या उंचीवर असल्याचे दिसून येत आहे. असे गौरवोद्गार चित्रलेखा पाटील यांनी काढले. यावेळी त्यांनी शुभेच्छा देत महिलांच्या कार्याचेही कौतुक केले.
दोन दिवस फेस्टीवलची धुम
अलिबाग नगर परिषदेच्यावतीने अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच परिषदेच्या मोकळ्या पटांगणात दिवाळी फेस्टीवल सुरू केले आहे. या फेस्टीवलचा शुभारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला असून, हा महोत्सव 1 नोव्हेंबरपर्यंत असा दोन दिवस भरणार आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त खरेदीची संधी नागरिकांना मिळणार आहे.
