कोळी बांधवांची दिवाळी जोरात

मुरुडच्या सुक्या मासळीला पर्यटकांची पसंती

| सुधीर नाझरे | मुरुड-जंजिरा |

मुरुडची जशी ताजी मासळी प्रसिद्ध आहे, तशीच सुक्या मासळीलाही मोठी मागणी आहे. येथे येणारे पर्यटक ताजी मासळी मिळाली नाही, तर सुक्या मासळीवर ताव मारतात. दिवाळीच्या हंगामात येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीची खरेदी होते. गेल्या वर्षी दिवाळीत जवळपास 25 ते 30 लाखांची उलाढाल झाल्याचे कोळी बांधवांकडून सांगण्यात येते. त्यामुळे येत्या दिवाळी हंगामासाठी कोळी बांधव सज्ज झाले असून, सध्या मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्याच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

मुरुडला दिवाळी हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने चांगला जातो. राज्यभरातून हजारो पर्यटक दिवाळीच्या सुट्टीत मुरुडला भेट देत असतात. पर्यटक दिवाळीची गुलाबी थंडी व ताजे मासे खाण्यासाठी येत असतात. त्यामुळे या दिवसात तालुक्यातील राजपुरी, दिघी, नांदगाव आदी ठिकाणचे मच्छी विक्रेते मुरुडमध्ये ताजी तसेच सुकी मासळी विक्रीसाठी घेऊन येतात. या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते. गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामात 25 ते 30 लाखांची उलाढाल झाल्याचे येथील स्थानिक मच्छी व्यावसायिकांनी सांगितले. मुरुडला भेट देणाऱ्या पर्यटकांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ताजी मासळी. पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबी या मच्छीवर ताव मारतात. शिवाय, वर्षभर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सुके सोडे मोठ्या प्रमाणात खरेदी करुन घेऊन जातात. मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. कोणताही वईस वास न येणारे सोडे फक्त मुरुडला मिळतात. त्यामुळे सोडे खरेदी लाखांची उलाढाल दरवर्षी होते. त्यामुळे मुरुडच्या अर्थकारणाला दिवाळी हंगामाचाही मोठा हातभार असतो.

ऑक्टोबरचे कडकडीत उन
दिवाळी हंगामासाठी कोळी बांधव एक महिना आधीपासूनच तयारीला लागतो. पर्यटकांची मागणी असणारी सुकी मच्छी या दिवसात सुकविण्यात येते. ऑक्टोबर महिन्याच्या कडकडीत उन्हात मच्छी मोठ्या प्रमाणात सुकविली जाते. यामध्ये सुरमई, हलवा, बोंबिल, अंबाडी सुकट, पांढरी सुकट मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यंदाही कोळी महिलांनी मोठ्या प्रमाणात मच्छी सुकविली आहे.
मच्छी सुविण्यासाठी जागेची प्रतीक्षा
कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीच्या उत्पादनावर बंधन आहे. मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रिटचे ग्राऊंड पाहिजे. जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम राहील, अशी अनेक वर्षांची येथील कोळी बांधवांची मागणी आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे
मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालदेखील होत असते. कोकणातून परदेश आणि परराज्यातदेखील मासे पाठवले जातात. शिवाय, त्यावर प्रक्रिया करणारेदेखील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी, वर्षाला हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते. परंतु, मुरुडकडे त्यादृष्टीने पाहिले जात नाही. मच्छिमारांसाठी रायगडला कोणताही चांगला प्रकल्प आला नाही. येथील मच्छिमारांचे मासेमारीत कौशल्य बघता येथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले, तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचले व मासे परदेशात नेणाऱ्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल. यासाठी लकोप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

गेली दोन वर्षे मच्छिमारांचा व्यवसाय पूर्णतः घटला होता. यावर्षी मासळी चांगली आहे, त्यामुळे कोळी बांधव समाधानी आहे. पूर्वी दिवाळी हंगामात 50 लाखांहून अधिक उलाढाल होत असे. आता पर्यटक संख्या कमी झाल्याने अजूनही मंदीची लाट आहे. सरकारने कोळी बांधवाच्या सवलती बंद केल्याने अनेक कोळी कुटुंबं खचलीत व मासेमारी सोडून इतर कामधंदे करत आहेत. याकडे कोणीतरी लक्ष देण्याची गरज आहे.

प्रकाश सरपाटील, मच्छिमार

मुरुडचे ताजे मासे खाण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. दरम्यान, वर्षभरासाठी सुकी मच्छीदेखील घेऊन जातो. येथील सुक्या मच्छीची चव अन्य ठिकाणच्या मच्छीला नाही. गेल्या वर्षी मी जवळपास तीन हजारांची सुकी मच्छी खरेदी केली होती.

ज्योत्स्ना सलाग्रे, पर्यटक, ठाणे

सध्याचे भाव
कोळंबी सोडे 1400/- प्रति किलो
सुके बोंबील 600/- प्रति किलो
अंबाडी सुकट 400/- प्रति किलो
सुकी सुरमई 400/- प्रति नग
Exit mobile version