दिया सामंतच्या शैक्षणिक यशाचा गौरव

नगरसेवक किशोर पाटकरांकडून एक लाख रुपयांचे बक्षीस

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा 2025-26 मध्ये शंभर टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या दिया निलेश सामंत हिचा पाट हायस्कूल येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (बेलापूर विधानसभा क्षेत्र) तथा नवी मुंबई मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर अशोक पाटकर यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते तिला रोख एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी नरेश परब (ग्रंथपाल, पणदूर हायस्कूल), अविनाश वालावलकर, हेबाळकर सर, दियाचे पालक निलेश सामंत व नेहा सामंत, सानिया सामंत उपस्थित होते. संस्था व विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

किशोर पाटकर हे शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी सातत्याने योगदान देत असून, त्यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांना मोफत 200 सायकलींचे वाटप केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना आतापर्यंत सुमारे 1,500 ते 2,000 सायकलींचे वितरण करून शिक्षणासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण येऊ नये आणि त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.

कार्यक्रमास संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, कार्यवाह विजय ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, गुणवत्ता वाढ प्रमुख विनायक कांबळे, वर्गशिक्षिका सुमती मळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले, तर आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले.

Exit mobile version