विम्बल्डन 2024 अंतिम टप्प्यात
। विम्बल्डन । वृत्तसंस्था ।
विम्बल्डन 2024 (टेनिस टूर्नामेंट)च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांचा निर्णय झाला आहे. पुरुष एकेरीत गतविजेता कार्लोस अल्कारेझचा सामना सात वेळच्या चॅम्पियन नोव्हाक जोकोविचशी होणार आहे. या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या लढतीत दोघेही सलग दुसर्यांदा आमनेसामने येणार आहेत. आता पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच भिडणार आहेत. या दोघांमध्ये 14 जुलै रोजी विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.
जोकोविच दहाव्यांदा अंतिम फेरीत
जोकोविचने विम्बल्डन 2024च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटालियन लॉरेन्झ मुसेट्टीचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये पहिला सेट 6-4 असा संपला, दुसरा सेट 7-6 (7/2) असा संपला, तर जोकोविचने तिसरा सेट 6-4 ने जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात जोकोविचला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले असले तरी शेवटी तो विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आणि टेनिस कारकिर्दीत तो दहाव्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणार आहे. जोकोविचने आतापर्यंत 7 वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले असून, या वेळीही तो जिंकला तर तो महान टेनिसपटू रॉजर फेडररच्या सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
पुन्हा अल्का'राज'?
स्पेनचा 21 वर्षीय युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने विम्बल्डन 2024 स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. शुक्रवारी (दि.12) पाचव्या मानांकीत डॅनिल मेदवेदेवला त्याने पराभूत करत सलग दुसर्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. गेल्यावर्षी अल्काराजने विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घालत मोठा पराक्रम गाजवला होता. शुक्रवारी सेंटर कोर्टवर 2 तास 55 मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात अल्काराजने मेदवेदेवला 6-7(1), 6-3, 6-4, 6-4 अशा चार सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. गेल्या 25 वर्षात बिग फोर व्यतिरिक्त म्हणजेच रॉजर फेडरर, राफेल नदाल, अँडी मरे आणि नोवाक जोकोविच व्यतिरिक्त एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन्ही स्पर्धाच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहचणारा अल्काराज पहिलाच पुरुष खेळाडू आहे.