एमएसआयडीसी अन् कंत्राटदाराला कायदेशीर नोटीस
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग येथील रेवदंडा बाह्यवळण मार्गावरील रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत करण्यात आले आहे. मात्र, कामातील हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिंतामणराव केळकर अर्थात डिकेटी विद्यालयातील सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमर वार्डे आक्रमक झाले असून, त्यांनी एमएसआयडीसी आणि संबंधित कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात वकिलांमार्फत अंतिम कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरानजीक असलेल्या रेवदंडा बाह्यवळण मार्गावरील रस्त्याच्या लगत चिंतामणराव केळकर विद्यालय आहे. या विद्यालयामध्ये 2 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या बाजूला असलेल्या या डांबरी रस्त्याच्या जागी सिमेंट काँक्रीटचा रस्ता एमएसआयडीसीमार्फत करण्यात आला आहे. त्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले. दरम्यान, हा रस्ता करताना शाळेच्या उत्तर बाजूकडील संरक्षक भिंतीलगत प्रचंड खोदाई करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक पाण्याचा मार्ग बंद होऊन शाळेच्या पटांगणात दलदल व चिखल साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान, हा रस्ता सुमारे एक फुटाने उंच झाल्यामुळे शाळेच्या प्रवेशद्वारासाठी रॅम्प बांधणे, बुजलेली गटारे नव्याने खोदून काँक्रिटायझेशन करणे आणि शाळेसमोरून काढलेले गतिरोधक पुन्हा बसवून देणार असल्याचे कंत्राटदाराने मान्य केले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र कोणतेही शाश्वत काम न करता केवळ मातीचा भराव टाकण्यात आला आहे. तसेच, गतिरोधक न बसवता रस्ता तसाच सोडून देण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.







