माणगाव पोलिसांची दोघींना अटक
| माणगाव | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असताना एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या दोन महिला संशयितांना माणगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे गंठन असा सुमारे सहा तोळे वजनाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी महाड येथे जाण्यासाठी एक महिला माणगाव बसस्थानकात बसमध्ये चढत होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी तिच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. बसस्थानक परिसरातील हालचाली, मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान माणगाव ते कोणगाव तसेच भिवंडी परिसरापर्यंत पोलिसांनी शोधमोहीम राबवली. अखेर दोन महिला संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा उलगडा झाला. या कारवाईत चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे गंठन असा मुद्देमाल 100 टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवधरे आणि माणगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.







