कर्जतच्या लेकींनी संगीताचे आभाळ लिलया पेलले

‌‘ज्ञानेश्वरी’ने शास्त्रीय संगीताला लावले चार चाँद

| पनवेल | वार्ताहर |

खेळण्या बागडण्याच्या वयात तिची बोटं हार्मोनियमवर महाशिवाच्या तांडवासारखी थिरकतात… आवाजातील माधुर्य सप्तकातील आभाळ व्यापून राहते. माऊलीने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरीतून जगाला तत्त्वज्ञान दिले. इथे कर्जत, कशेळीची इयत्ता सातवीत शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी दाभणे माऊलीच्या पायवाटेने संगीताची पाठशाला सुरु करून नवा इतिहास रचण्याचा पराक्रम गाजवत आहे.

अवघ्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे पाचवीत असताना ज्ञानेश्वरी दाभणे या चिमुकलीने श्री कृष्णाबुवा यांच्याकडे संगीताचे धडे गिरवायला प्रारंभ केला. दोन वर्षात तिने सप्तसुरांशी मैत्री जमवली आहे. बरं, तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीनुसार समवयस्क म्हणजे तिच्याच वयाच्या चिमुकल्यांचा भजनी संच बांधला आहे. त्यामुळे या लिटिल चॅम्समध्ये कमालीची नम्रता आणि संगीताची तितकीच जाण अनुभवायला मिळते. शास्त्रीय संगीतातील बारकावे तिने आत्मसात केले आहेत. तिला तबल्यावर आणखी एक चिमुकली साथ देते. तबला वाजवताना तिची देहबोली नर्तिकेसारखी तल्लीन होऊन तबल्याच्या सुरात डोलते. संचिता दाभणे असे दुसऱ्या गोड बाहुलीचे नाव आहे. हा संच इतका बोलका आहे की, सगळ्या जणी अगदी किरकोळ शरीरयष्टीच्या वाटत असल्या तरी सादरीकरणात त्या बाप असल्याचे सिद्ध करतात. तबला आणि पखवाजची जुगलबंदी ऐकताना तहानभूक हरपायला होते. पखवाजातील जातिवंत सूर काढण्याची लीला दर्शन पवार नावाचा त्यांच्यापेक्षा थोडा वयाने मोठा असणारा युवक पेलतो. तर ज्ञानेश्वरीला कोरस देणाऱ्या सानिका भोईर, धनश्री दाभणे, गौरी दाभणे, वेदिका मते यांचा आत्मविश्वास प्रचंड दांडगा आहे. ज्ञानेश्वरीने कोणत्याही प्रकारचे सुगमसंगीत, भजन अथवा भावागीत किंवा पोवाड्यासारख्या पहाडी आवाजातील गीत पेश करायला सुरुवात केली की, कोरस देणाऱ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हजार चंद्रांची शीतलता आणि शेकडो सुर्यांचे तेजाब चेहऱ्यावर लखलखताना दिसतात.

ऋषिकेश मते आणि प्रसाद शिंदे यांची चकव्याची साथ तसेच मारुती शेळके यांचे अनमोल मार्गदर्शन हे त्यांचे वेगळे भांडवल ठरत आहे. कर्जतचे सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील चळवळीचे कार्यकर्ते उदय पाटील यांची त्यांना मोलाची साथ लाभत आहे, ही जमेची बाजू ठरत आहे. कांतीलाल प्रतिष्ठान रायगडने पनवेलचा महागणपती चरणी ज्ञानेश्वरी नावाचा नवा अध्याय पारायणाचा प्रयोग केला. तो उत्कृष्टरित्या यशस्वी झाला. महागणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी ज्ञानेश्वरी आणि सहकाऱ्यांना मोबाईलमधील व्हिडीओत कैद केले. कुणी मनसोक्त फोटो काढले. तर, अनेकांनी टाळ्यांनी दाद देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित केला. एकंदर, कर्जतच्या लेकीने पनवेलचे मैदान लिलया मारले.

Exit mobile version