चायनीज पदार्थातील अजिनोमोटोचे अतिक्रमण शरीराला घातक
| रायगड | खास प्रतिनिधी |
आताच्या फास्ट लाईफ स्टाईलच्या जमान्यात हे हेल्दीफूड खाण्याऐवजी फास्टफूड खाण्यालाच पसंती दिली जात आहे. चमचमीत, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने, विशेष करुन चायनीज पदार्थ खाल्ल्याने ते घातक ठरु शकते. चायनीच पदार्थामध्ये असणारा अजिनोमोटो अतिशय घातक ठरतो. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा पोटासाठी खाल्ले तर, ते शरीरसाठी नक्कीच फायदेशीर ठरते. मात्र, संबंधित यंत्रणांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजकाल आपली जीवनशैली बदलली आहे. प्रत्येकाचेच आयुष्य हे धावपळीचे झाले आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या वेळा चुकत आहेत. वेळी-अवेळी खाण्यामुळे विविध आजारांना निमंत्रण देण्यात येते. घरचे जेवण खाण्यापेक्षा हॉटेलमधील चमचमीत पदार्थांवर चांगलाच ताव मारला जातो. फास्टफूड खाण्याला पसंती दिली जात आहे. त्यामध्ये जास्त करुन चायनीज पदार्थ खाण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येते. याच कारणांनी प्रत्येक चायनीज फूडच्या स्टॉलवर अथवा रेस्टॉरंटमध्ये खवय्यांची चांगलीच गर्दी दिसून येते. परंतु, चायनीज पदार्थ तयार करताना अजिनोमोटो हा घटक वापरण्यात येतो. त्याचे सातत्याने सेवन हे शरीरासाठी अतिशय घातक ठरते.
अजिनोमोटो म्हणजे काय?
अजिनोमोटोला ‘मोनो सोडिअम ग्लुटामेट’ या व्यावहारिक नावाने ओळखले जाते. अजिनोमोटोचा वापर हा जास्त करून चायनीज खाद्यपदार्थ तयार करताना केला जातो. अजिनोमोटा हा मसाला नाही, तर हा एक स्वाद आहे. आंबट, गोड, तिखट, खारट तसाच हा एक पाचवा स्वाद आहे. जो थोडा तुरट वेगळ्याच चवीचा आहे. पदार्थाचा स्वाद वाढवण्याबरोबरच पदार्थाचे आयुष्य टिकवण्याचे काम अजिनोमोटो करतो.
चायनिज आरोग्यास घातक ठरु शकते
अजिनोमोटोच्या अतिसेवनाने आपल्या शरीराला विविध विकार जडण्याची शक्यता असते. हा पदार्थ किती प्रमाणात खावा याबाबत मानक ठरलेले आहे. परंतु, सातत्याने अजिनोमोटोच्या सेवनाने पोटाचे विकार वाढतात. डिप्रेशन, उच्च रक्तदाब, मधुमेह, एकाग्रता भंग होणे, असे आजार बळावण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ते खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.
सकस आहार घ्यावा
स्वाद वाढवण्यासाठी आणि पदार्थाचे आयुष्य टिकवण्यासाठी अजिनोमोटोचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. अजिनोमोटो किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, याबाबत काही मानत ठरलेले आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यास मानवी शरीरास फारच अपायकारक ठरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे. वेळेवर सकस आहार घ्यावा.