शाळा बंद विरोधी परिषदेत ठराव मंजूर
| रायगड | खास प्रतिनिधी |
कमी पटसंख्येअभावी समायोजनाच्या नावाखाली राज्यात बंद होणाऱ्या 20 हजार सरकारी शाळा बंद करण्याऐवजी सोमवारपासून सुरू होणाऱ्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणावरील आर्थिक तरतूद वाढवून सर्व शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा आयोजित शाळा बंद विरोधी परिषदेत ठरावाद्वारे करण्यात आली आहे. रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्यावतीने शाळा बंद विरोधी परिषद जनता शिक्षण मंडळाच्या ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या जयंतराव केळुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
संविधानातील कलम 21 सांगते की, सर्वांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार या जबाबदारीतून मुक्त होत खासगी भांडवलशाही शिक्षण व्यवस्था आणण्याच्या उद्देशाने राज्यातील सुमारे वीस हजार ग्रामीण आणि डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या शाळा कमी पटसंख्येचे कारण देत समायोजन नावाखाली बंद करण्याच्या घाट घालत आहे. ज्याचा परिणाम राज्यातील हजारो तसेच रायगड जिल्ह्यातील शेकडो शाळांवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागातील बालकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. शासनाच्या या धोरणाच्या सभेमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. 26 फेब्रुवारीपासून 2023-24 अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शाळा बंद विरोधी परिषदेत करण्यात आली.
शाळा बंद विरोधी परिषदेचे उद्घाटन ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲड. नीलम हजारे यांनी केले, तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केले. प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी शाळा बंद होण्याचे कारण हे शैक्षणिक नसून राजकीय आहे, असे विशद करताना त्यांनी येऊ घातलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कडाडून टीका केली. यावेळी या परिषदेस पाठिंबा दर्शविणाऱ्या संस्था-संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण काकडे (ऑल इंडिया धनगर समाज महासंघ), शैलेश पालकर ( महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ), एकनाथ वाघे (आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र), सिद्धार्थ इंगळे (महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन महाराष्ट्र) रोशन पाटील ( शिवराज्य प्रतिष्ठान), सुशील साईकर (रूरल यंग फाऊंडेशन), मोहिनी गोरे यांनी आपले मत व्यक्त करत शाळा बंद विरोधी परिषदेस पाठिंबा दर्शवला.
अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रा. संदीप घाडगे, सदस्य प्रा. नरेश मोकल आणि शैलेश कोंडास्कर यांनी परिषदेत मंजूर झालेल्या ठरावांचे वाचन केले आणि सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. प्रा. रमेश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात शाळा बंद विरोधी काम करणाऱ्या सर्व संस्था-संघटनांना एकत्र येऊन व्यापक आंदोलन करण्याचे आवाहन केले.