श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कारभाराचा भोंगळ कारभार आणि एका डॉक्टरचे रुग्णांशी असलेले बेपर्वाईचे वर्तन पुन्हा एकदा समोर आले आहे. किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तब्बल तासभर ताटकळत ठेवण्यासोबतच, “या क्षुल्लक कारणासाठी मला फोन केला का?” असा संतापजनक प्रश्न विचारत डॉक्टरने उद्धटपणा दाखवल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.4) श्रीवर्धन येथील रोशन बोरकर व त्यांचा एक कामगार शेतात काम करत असताना पायाला खिळा लागून दुखापत झाली. उपचारासाठी सकाळी नऊ वाजता ‘टीटी’चे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी “टीटीचे इंजेक्शन आम्ही देऊ शकत नाही, डॉक्टरच देतील” असे सांगून डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये असल्याचे सांगितले. काही वेळाने डॉक्टरांना निरोप दिल्यानंतर आलेल्या डॉक्टरांनी कोणतीही सहानुभूती न दाखवता, “ओपीडी सुरू झाल्यावर या” असे उद्धट भाषेत सुनावले. आरोग्य यंत्रणेच्या या उदासीन कारभारामुळे रुग्णांची काळजी वाहणारे डॉक्टरच आता रुग्णांसाठी डोकेदुखी ठरत आहेत का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.कौस्तुभ केळस्कर
झालेल्या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात येते की, संबंधित वेळी उपजिल्हा रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी गंभीर बालरुग्णाच्या आपत्कालीन उपचारामध्ये व्यस्त होते. त्यामुळे नियमित टिटॅनस इंजेक्शनसाठी आलेल्या रुग्णास काही वेळ प्रतीक्षा करण्याची विनंती करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत रुग्णास आरोग्य सेवा नाकारण्यात आलेली नव्हती. तथापि, रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक रुग्णाशी नम्रतेने व संवेदनशीलतेने वागण्याच्या तसेच कोणत्याही वेळेस उपचारासाठी आलेल्या रुग्णास शक्य तितक्या तातडीने आवश्यक आरोग्य सेवा व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘या क्षुल्लक कारणासाठी मला बोलावले का?’ असा संतापजनक प्रश्न केला. यावरून रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णांच्या आरोग्याची आणि जीवाची कोणतीही काळजी उरलेली नाही हेच स्पष्ट होते.”
रोशन बोरकर
(बाधित रुग्ण)
