अत्याचार व हत्येविरोधात डॉक्टर एकवटले

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ निदर्शने

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ शनिवारी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडियन मेडिकल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य एकवटले. अत्याचार करणार्‍यांसह पुरावे नष्ट करण्यासाठी तोडफोड करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा अनेक मागण्या निदर्शनादरम्यान करण्यात आल्या.

कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटले असून, रायगड जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय विद्यालयातील विद्यार्थिनी एकत्र येऊन निषेध व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच जमलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना मारहाण करून समाजकंटकांनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने महाविद्यालयात तोडफोड केली.

इंडियन मेडिकल असोसिशन व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने शनिवारी (दि.17) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिराकोट तलावाजवळ या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. तीव्र संताप व्यक्त करीत घोषणा देण्यात आल्या. अत्याचार करणार्‍यांना व रुग्णालयाची तोडफोड करून पुरावे नष्ट करणार्‍यांना कडक शासन करण्यात यावे, पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने देशपातळीवर स्वतंत्र कायदा करावा, अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी डॉ. विनायक पाटील, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. निशिगंध आठवले, डॉ. नवलकिशोर साबू, डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. मेधा घाटे, डॉ. सचिन जायभाय आदी इंडियन मेडिकल असोसिशन, रायगड मेडिकल असोसिएशन, आयुर्वेद व्यासपीठ (जिल्हा रायगड)चे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

आतापर्यंत डॉक्टरांवर हल्ले केले जात होते. आता महिला डॉक्टरांवर अत्याचारही होत आहे. त्यामुळे काम करणे कठीण जाणार आहे. महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. डॉक्टरांसह इतर महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न देशात आहे. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ संप पुकारला आहे. रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. परंतु, नागरिकांनीदेखील आम्हाला सहकार्य करावे. सर्व महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. हा उद्देश समोर ठेवून संप सुरु केला आहे.

डॉ. विनायक पाटील

इंडियन मेडिकल असोसिशन व रायगड मेडिकल असोसिशनच्या वतीने हे नमूद करतो की, कोलकाता येथे झालेली ही घटना घृणास्पद आहे. महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या झाली आहे. ही घटना व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतली नाही. पोलिसांकडून चांगले सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. ही यंत्रणा गांभीर्याने तपास करेल असा विश्‍वास असून, महिलेला नक्की न्याय मिळण्याबरोबरच भारतातील प्रत्येक महिलेला न्याय मिळेल.

डॉ. राजेंद्र चांदोरकर,
सेक्रेटरी, आरएमए

रात्रीचा दिवस करून रुग्णांना सेवा दिली जात आहे. कोलकाता येथील अत्याचार व हत्येच्या घटनेनंतर महिला डॉक्टरांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. रुग्णालयात सुरक्षा नसल्याने सेवा देणार कशी, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. या घटनेनंतर देशातील प्रत्येक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये. महिला सुरक्षेसाठी नवीन कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

डॉ. मेधा घाटे
डॉक्टरांचा देशव्यापी संप
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिशनदेखील या संपात सहभागी झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी (दि.17) सकाळी सहा ते रविवारी (दि.18) सकाळी सहा वाजेपर्यंत दवाखाना पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अतितातडीची सेवा वगळता कोणतीही वैद्यकीय सेवा देण्यात येणार नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रुग्णालयात काळ्यात फिती लावून निषेध
महिला डॉक्टरवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय दवाखान्यांसह सरकारी वैद्यकीय दवाखान्यांकडून त्याचा निषेध व्यक्त केला आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत काळ्या फिती लावून सेवा देण्याचे काम करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी दिली.
Exit mobile version