अनधिकृत अवजड वाहतुकीला आशीर्वाद
| पेण | प्रतिनिधी |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हप्तेखोरीमुळे सर्रास मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ-अलिबाग मार्ग, पेण-खोपोली बायपास रोड यावर शनिवार व रविवार पाहिले तर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, याबाबत उपप्रादेशिक अधिकार्यांना काही पडलेले नाही. कारण, मोठ्या प्रमाणात या कार्यालयात चालू असलेली हप्तेखोरी त्या हप्तेखोरीच्याच आशीर्वादाने बिनधास्त ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे.
प्रत्येक रस्त्याला एक क्षमता ठरलेली असते. त्या क्षमतेच्या वजनाएवढेच वाहन मालाची वाहतूक करू शकते. परंतु, मुंबई-गोवा महामार्गावर सर्रास ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यातच ही ओव्हरलोड करणारी वाहने आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांचे असणारे घनिष्ठ संबंध यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीत 300 ते 350 वाहने कॉईल (लोखंडी पत्रा) यांची वाहतूक करत आहेत. साधारणतः एका कॉईलचे वजन 18 टन, 20 टन, 25 टन एवढे असते. मात्र, ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या कॉईल वाहून नेत असतात. एका गाडीमध्ये दोन-दोन कॉईल भरुन वाहतूक होत असते. ही वाहतूक रात्री 10 नंतर सुरु होते. तसेच दिवसभर ही वाहने कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या पंपामध्ये किंवा रिकाम्या जागांवर पार्किंग केलेली असतात. तसेच पेण-खोपोली बायपास रोडलादेखील सर्रास वाहने उभी असतात.
मधल्या काळात नागोठणे ते खारपाडा यादरम्यान महेशनामक एजंटकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वसुलीचे पैसे पोहचत होते. मात्र, आता पहाटे चार ते सातच्या दरम्यान ओव्हरलोड वाहतूक होत असून, प्रत्येक गाडीला वेगवेगळा सांकेतिक क्रमांक दिला असून, तो सांकेतिक क्रमांक दाखविल्यावर अधिकारी गाडी अडवत नाही, अशी खात्रीलायक माहिती आहे. अधिकार्यांना तो सांकेतिक क्रमांक दाखविला असता, आपल्या हिस्स्याची मलई पोहोच झाली आहे असे समजते. आणि ते अधिकारी त्या गाडीला अडथळा न करता पुढे जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवतात, अशी चर्चा आहे.
उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून आजच्या घडीला कर्मचारी कमी आहेत असे सांगून स्वतःची मान वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, खरी परिस्थिती पाहता, कर्मचारी कमी असणे म्हणजेच मलईचा वाटा जास्त मिळणे असाच होतो. मात्र, हा गोरखधंदा उजळ माथ्याने अधिकार्यांचे हस्तक करत आहेत. याला कुठेतरी चाप बसणे गरजेचे आहे. परंतु, असे सध्या तरी होईल असे चित्र दिसत नाही. कारण, अधिकार्यांनी आपापल्या परीने धनलक्ष्मीचे दर्शन घ्यायचे ठरवले एवढे निश्चित.
अधिकार्यांची टाळाटाळ
ओव्हरलोड वाहतुकीसंदर्भात कृषीवलच्या प्रतिनिधींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांना (8108449159) संपर्क करुन विचारणा केली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी मला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगून ओव्हरलोड वाहतुकीवर बोलणे टाळले.
गाडीमागे दोन ते अडीच हजार?
ही ओव्हरलोड वाहतूक करणार्या वाहनांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशिष्ट प्रकारचे कार्ड दिले जातात. या बदल्यात अधिकारी वर्गाचे हस्तक गाडीमागे दोन ते अडीच हजार रुपये महिन्याला घेतात, अशी चर्चा आहे. ही ओव्हरलोड वाहने दिवसाला दोन दोन फेर्या मारतात. तसेच, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विज्याभाई, संज्याभाई, अभिभाई, किरणभाई या नावाच्या व्यक्ती अधिकार्यांचे हस्तक म्हणून कार्डचे पैसे जमा करत असतात. तसेच कोळसा, वाळू वाहतूक करणार्या वाहनांकडून एका गाडीवाल्याजवळून महिना 12 हजारांपासून ते 22 हजारांपर्यंत अवैधरित्या हप्ता गोळा केला जात आहे. यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून खास माणसे तालुकानिहाय नेमली आहेत. ही माणसे महिन्याच्या महिन्याला या वाहनचालकांकडून हप्ता गोळा करत आहेत, अशी चर्चा आहे.