। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद नियोजित माणगाव तालुक्यातील साई बीटच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मोर्बा येथे शुक्रवारी (दि.13) संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शौकत रोहेकर व मुख्याध्यापक खालिद अहमद खान यांनी केले. सर्वप्रथम व्यक्तिमत्व विकास अंतर्गत समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर पारंपारिक गीत (नृत्य स्पर्धा) घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात वैयक्तिक स्पर्धेमध्ये दोरी उड्या (मुली), बेचकीने नेम धरणे (मुलं), माती कामातून वस्तू बनवणे या स्पर्धा घेण्यात आल्या. तर, मैदानी खेळामध्ये लगोरी (मुलं) तर लंगडी (मुली) या स्पर्धा झाल्या. या सर्व स्पर्धांमध्ये साई बीटातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता.