नवी मुंबईत देशांतर्गत विमान सेवा सुरू

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या देशांतर्गत हवाई मार्गांच्या जाळ्याचा मोठा विस्तार करत नऊ नव्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या विस्तारामुळे महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, आसाम, झारखंड, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीप या राज्यांतील प्रमुख शहरांशी मुंबई महानगर प्रदेश थेट जोडला जाणार आहे. यामुळे प्रादेशिक हवाई जोडणी अधिक बळकट होण्यासोबतच पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता अगत्ती (गोवा-मोपा मार्गे), दरभंगा, गुवाहाटी, जळगाव, जोधपूर, रांची, बागडोगरा, सिंधुदुर्ग आणि उदयपूर या नऊ नवीन ठिकाणी उड्डाणे उपलब्ध होणार आहेत. या नव्या हवाई मार्गांमुळे प्रवाशांना विविध पर्यटनस्थळे, सांस्कृतिक केंद्रे आणि प्रादेशिक बाजारपेठांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.

सिंधुदुर्ग सेवांमुळे कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले व जलक्रीडा पर्यटनाला गती मिळेल, तर जळगाव जोडणीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि ऐतिहासिक अजिंठा लेण्यांपर्यंतचा प्रवास सोपा होईल. जोधपूर आणि उदयपूरमुळे राजस्थानातील किल्लेे, राजवाडे व डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांपर्यंत सहज पोहोचता येईल. बागडोगरा मुळे दार्जिलिंग, कालिम्पोंग, सिक्कीम आणि पूर्व हिमालयीन पर्यटन क्षेत्राशी संपर्क वाढेल. गुवाहाटीमुळे आसाम व ईशान्य भारतातील वन्यजीव पर्यटन सुलभ होईल, तर दरभंगा आणि रांचीमुळे बिहारमधील मिथिला प्रदेश व झारखंडमधील धबधबे-जंगलांच्या पर्यटनाला वाव मिळेल. गोवा-मोपा मार्गे अगत्ती हवाई सेवेमुळे लक्षद्वीपमधील सागरी पर्यटनाचा मार्ग सुकर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत मोठी झेपप्रादेशिक जोडणीसोबतच आंतरराष्ट्रीय मालवाहतूक क्षेत्रातही विमानतळाने मोठी झेप घेतली आहे. सेवा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 493 मालवाहू विमानांची नोंद झाली आहे. सध्या 18 प्रमुख विमान कंपन्यांद्वारे जगातील 45 ठिकाणी मालवाहतूक केली जात आहे. यामध्ये एमिरेट्स, कतार एअरवेज, लुफ्तहान्सा, एअर फ्रान्स आणि टर्किश एअरवेज यांसारख्या प्रवासी कंपन्यांसह डीएचएल, टलास एअर आणि रोलॉजिक यांसारख्या विशेष कार्गो कंपन्यांचा समावेश आहे. युरोप, मध्य पूर्व, आशिया आणि आफ्रिकेशी जोडलेल्या या जाळ्यामुळे विमानतळाची जागतिक स्तरावरील मालवाहतूक क्षमता अधिक मजबूत झाली आहे.

Exit mobile version