। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सेन्सेक्सची घसरण आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलेंडर 550 रुपयांवर गेला आहे. तर, बिगर उज्ज्वला योजनेतील सिलेंडर 803 वरून 853 रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली. आधीच वाढणारी महागाई, त्यात सिलेंडरही महाग झालs आहे. त्यामुळे याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. एलपीजी गॅस दरवाढ आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढलेल्या किमती 8 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. गॅस विक्रीत तेल कंपन्यांचे 43,000 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन मिळावे म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. नवीन किमतींनुसार उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.