पालीवाला महाविद्यालयातर्फे श्रमदान


| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय पाली सुधागड, जिल्हा रायगड यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबीर भार्जे येथे 16 ते 22 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार उत्तम कुंभार यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे कौतुक केले.

या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, नदीपात्राची स्वच्छता, प्लास्टिक मुक्त गाव, स्मशानभूमीची स्वच्छता, वनराई बंधारा आणि ग्राम सुशोभीकरण इत्यादी उपक्रम विद्यार्थी श्रमदानातून साकारणार आहेत. श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन , शासकीय योजनांच्या संदर्भातील जाणीव जागृती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, आणि ग्रामीण सक्षमीकरण इत्यादी विषयांवर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे प्रशिक्षण पाली तालुक्याचे कृषी अधिकारी अशोक महामुनी यांनी दिले. या शिबिरासाठी चिंतामण सुतार, सुभाष कोंडे, प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग, प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. ज्ञानेश्‍वर मुंढे, डॉ. अनिल झेंडे, विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी तांबोळी, कुमार दर्शन दंत, कुमार राकेश शिंदे व सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतलेले आहे.

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारलेल्या वनराई बंधार्‍याचे, नदीपात्राची स्वच्छता, स्मशानभूमी व ग्रामस्वच्छतेची शिबिराच्या दरम्यान पाहणी केली असता विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे.

उत्तम कुंभार
तहसीलदार सुधागड


Exit mobile version