तालुका चिटणीस रमेश मोरेंची माहिती
। माणगाव । प्रतिनिधी ।
आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील मोर्बा जिल्हापरिषद गटातील डोंगरोली खालची वाडीतील सरपंचासहित ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दि.4 फेब्रुवारी रोजी डोंगरोली येथे होणार्या कार्यक्रमात आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत व शेकापचे मोर्बा येथील ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, राजिप सदस्या आरती रमेश मोरे यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
त्याबाबत माहिती देण्यासाठी तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी आपल्या माणगाव येथील निवासस्थानी मंगळवारी (दि.1) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला डोंगरोली सरपंच राजेंद्र डोंगरे, गावाध्यक्ष भागोजी बालाजी डोंगरे, सचिव बाबुराव भिकू डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश लक्ष्मण डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना तालुका चिटणीस मोरे यांनी सांगितले आरती मोरे जिल्हापरिषद सदस्य झाल्यावर डोंगरोली ग्रामपंचायत हद्दीत आपण 30 ते 32 लाख रुपयांची विकासकामे शेकापमार्फत केली आहेत. या विकासकामांना भारावून मोर्बा जिल्हापरिषद गटातील अनेक गावातील ग्रामस्थ आपल्या संपर्कात आहेत. डोंगरोली खालची वाडी ग्रामस्थांबरोबर देगाव व अन्य एक दोन गावातील ग्रामस्थ शेकापमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.