दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यंदा देशात विश्वचषकाचा सोहळा रंगला आहे. अशातच भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करत आहे. आतापर्यंत विश्वचषक2023 मध्ये खेळवण्यात आलेल्या सर्वच्या सर्व सामन्यांत भारतीय संघानं विजय मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही भारतीय संघानं धडाकेबाज कामगिरी करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारतीय संघानं फायनलमध्ये थाटात प्रवेश मिळवला. या विजयासाठी जितकी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांची चर्चा होत आहे, तितकीच चर्चा मोहम्मद शामीच्या घातक गोलंदाजीचीही होत आहे. एकीकडे मोहम्मद शामीवर कौतुकाचा वर्षाव थांबण्यात नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे शामीबाबत दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन केलेल्या एका ट्वीटच्या चर्चा जोरदार सुरू आहे.
मोहम्मद शामीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट घेत किवी संघाचा धुव्वा उडवला. सामन्यात एक वेळी अशी आली की, आता काही खरं नाही, टीम इंडियाचं वर्ल्डकप उंचावण्याचं स्वप्न अधुरंच राहील असं वाटत होतं , मात्र शामीनं बॉल हातात घेतला आणि न्यूझीलंडवर तुटून पडला. शामीमुळेच टीम इंडियानं सामन्यात पुनरागमन केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचवेळी, दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी मोहम्मद शामीच्या गोलंदाजीबाबत ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना उद्देशून दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे की, मोहम्मद शामीला अटक करू नका. या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
मोहम्मद शामीनं सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिल्ली पोलिसांनी हे गंमतीशीर ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो की, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शामीला अटक करणार नाही." याला उत्तर देताना मुंबई पोलिसांनीही एक गंमतीशीर ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "दिल्ली पोलीस, तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सहआरोपींची यादीही दिली नाही."