धीर सोडू नका, लढायचं आहे; ठाकरेंचे शेतकर्‍यांना आवाहन

| औरंगाबाद | प्रतिनिधी |

काही झालं तरी धीर सोडू नका, आता रडायचं नाही लढायचं अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या भेटीसाठी मराठवाडा दौर्‍यावर आहेत. त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवादही साधला. तसेच त्यांनी पेंढापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

अस्मानी संकटं आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकर्‍याला उघड्यावर पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावर पडता कामा नये. परंतु आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेण या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आजची माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांचं दिवाळं निघालेलं आहे. दिवाळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचं? हा मोठा प्रश्‍न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. मी का मुद्दाम आलो. केवळ आज विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही. तर या शेतकर्‍यांचं ऋण आपल्यावर आहे, नेहमीच असतं. महाविकास आघाडीच्या काळात साधरण दोन-अडीच वर्ष कोरोनाने आपली खाल्ली, सर्वत्र लॉकडाउन असताना, आपल्या अर्थव्यवस्थेला जर कोणी आधार दिला असेल तर आपल्या अन्नदात्याने दिला आहे. कृषी क्षेत्राने दिला आहे कारण तिथे लॉकडाउन करता येणं शक्य नव्हतं. जर शेतकरी तेव्हा राबला नसता, तर आपल्या आर्थिक परिस्थितीचं सुद्धा दिवाळं निघालं असतं, असे ते म्हणाले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त…
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर मोठा बंदोबस्त ठ्वेण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक पोलिसांचा यावेळी मोठा फौजफाटा पाहायला मिळाला.

Exit mobile version