फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका- प्रितम म्हात्रे

न्यू होरायझन पब्लिक स्कूलविरोधात पालक आक्रमक

| पनवेल | प्रतिनिधी |

फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये, असा इशारा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी न्यू होरायझन पब्लिक स्कूल प्रशासनाला दिला आहे. पालकांच्या स्कूलविरोधात अनेक तक्रारी आल्या असून, त्यांच्यावर फी भरण्यासाठी दबाव आणला जात असेल, तर शेतकरी कामगार पक्ष ते कदापि सहन करणार नाही, असे त्यांनी स्कूल प्रशासनास ठणकावून सांगितले.

खांदा कॉलनी पनवेल येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये शाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय दुसऱ्या सत्राची फी आगाऊ भरण्यासाठी सांगण्यात येते. विद्यार्थ्यांकडे असलेल्या नोटद्वारे पालकांपर्यंत लिखित स्वरूपात सदर गोष्ट कळवली जाते. असे असतानासुद्धा शाळा जर एखाद्या पालकाने फी उशिरा भरली, तर दंड आकारतात. ऑक्टोबर महिन्यापर्यंत दुसरे सत्र संपत असल्याने जर ऑक्टोबरनंतर ही भरली, तर आपण शालेय शिक्षण नियमानुसार शाळेने नक्कीच दंड घ्यावा. परंतु आगाऊ रक्कम गोळा करण्यासाठी शाळेमध्ये स्पीकरद्वारे अनाउन्समेंट केली जाते की, फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही, अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आली आहे. 1 ऑगस्ट रोजी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना फोन लावून तात्काळ बोलवून घेऊन फी संदर्भात विचारणा केली गेली हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत परीक्षेला बसणे हा सर्व विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु स्वयंघोषित निर्णय लावून त्यांना परीक्षेत बसण्यास जर अडचण निर्माण करून पालकांवर फी च्या पैशासाठी दबाव आणला जात असेल तर हे कदापि शेतकरी कामगार पक्ष सहन करणार नाही. शाळा प्रशासनाने थेट पालकांशी संवाद साधून चर्चा करावी, यात विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये.

प्रीतम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता
Exit mobile version