‘बेलापूर’ वर डोळा ठेवू नका


आमदार मंदा म्हात्रेंनी दिली आमदार गणेश नाईकांना इशारा


। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

कोणाच्या बापाचे राज्य नाही. बाप काढल्यावर यांना राग येतो, अशा शब्दांत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्याच्याच पक्षांतील आमदार गणेश नाईक यांच्यावर शाब्दीक हल्ला केला. ऐरोलीमध्ये यांना सगळे सोडून गेले म्हणून आता बेलापूर मतदारसंघावर यांचा डोळा आहे. पण लोकांना सगळं समजते. कोण मेहनत करते आणि कोण आयत्या जागेवर येते. ही बाब मतदार जाणतात, अशा शब्दांत म्हात्रे यांनी नाईक यांच्यावर बोचरी टीका केली.

बेलापूरमध्ये सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हात्रे यांनी नाईकांचा समाचार घेतला. स्वत: काम करायचे नाही आणि मी काम करायला गेले की त्यात खो घालायचा. पालिकेनं निधी दिला नाही म्हणतात. मग तुम्ही काय करत होतात. तुम्ही तर पालकमंत्री होतात. तुम्हाला का निधी आणता आला नाही, असा सवाल त्यांनी विचारला. रुग्णालयाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. या कामात आडकाठी आणू नका. अन्यथा मग भांडाफोड करावा लागेल. कोविड काळातल्या फाईल माझ्याकडे आहेत. किती लॅबमध्ये कुठे कुठे गेले? सगळ्या फाईल आहेत. काढू का कोविड काळातली एक तरी फाईल? कोविड काळात कोणी पैसे लुटले? असे सवाल करत म्हात्रेंनी नाईकांवर निशाणा साधला.

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते संदीप नाईक बेलापूर मतदारसंघात सक्रिय झाचे आहेत. म्हात्रेंच्या मतदारसंघात त्यांनी संपर्क कार्यालय उघडलं आहे. बेलापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नाईक यांची तयारी सुरु झाल्याने म्हात्रे सावध झाल्या आहेत. त्यामुळे एकाच पक्षात असलेल्या नाईक आणि म्हात्रे यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे.

गणेश नाईक ऐरोलीचे आमदार आहेत. तर मंदा म्हात्रे बेलापूरच्या आमदार आहेत. गणेश नाईक यांना ऐरोलीतून पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी हवी आहे. पण हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. इथून शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांचे तिकीट जवळपास निश्‍चित मानते जात आहे. त्यामुळे नाईक यांना मतदारसंघावर पाणी सोडावं लागू शकतं. शिंदे आणि नाईक यांचे विळ्याभोपळ्याते नाते आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ठाण्याची जागा शिंदेसेनेला सुटल्याने नाईक नाराज झाले. त्यांनी विषय राजीनाम्यापर्यंत नेल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते. ऐरोलीची जागा शिंदेसेनेला सुटण्याची शक्यता असल्याने नाईक यांनी मंदा म्हात्रेंच्या बेलापूर मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. गणेश नाईक यांच्या मुलालादेखील विधानसभेचे तिकीट हवं आहे. त्यामुळे म्हात्रे आणि नाईक यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत. मंदा म्हात्रे बेलापूरची जागा सोडण्यास तयार नाहीत. 2014, 2019 मध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता त्या हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत.

Exit mobile version