अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दुप्पट मदत – शिंदे

। मुंबई । प्रतिनिधी ।

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मिळणारी मदत ही दुप्पट करण्यात आली आहे. तसेच मेट्रो-3 च्या कामासाठी 10 हजार कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्रीमंडळ बैठक बुधवारी घेण्यात आली.

तीन हेक्टरची मर्यादा

शेतकर्‍यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून एनडीआरएफतर्फे मिळणार्‍या नुकसानभरपाईच्या दुप्पट भरपाई शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. दोन हेक्टरची असलेली मर्यादा आता तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. एनडीआरएफच्या माध्यमातून हेक्टरी 6800 रुपये देण्यात येत होते. आता हीच रक्कम 13,600 रुपये अशी दुप्पट करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल. मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभीर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Exit mobile version