। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे परिसरात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जावेळेसह पंचक्रोशीतील गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली वारंवार दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सलग दोन दिवस जावेळे व वडशेत वावे या ठिकाणी बिबट्याने येथील वासरांवर हल्ला चढवला होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तीन मानवी बळी गेल्यानंतरच कारवाई करू, असे वनविभागाकडून सांगितले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सरकारी नियमानुसार घटनेनंतर 48 तासांच्या आत पंचनामा करणे बंधनकारक असतानाही वनविभागाकडून सांगण्यात येते की, 24 तासांच्या आत कळवले तरच नुकसानभरपाई मिळेल; परंतु, प्रत्यक्षात मात्र हेच वन अधिकारी 24 तासांनंतर घटनास्थळी पोहोचतात आणि रितसर पंचनामा न करता केवळ फोटोसेशन करून परत जातात. तसेच, अद्याप कोणालाही नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे विभागाकडून नुसते फोटो काढून नेण्यामागचा उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी फोटोच्या आधारे नुकसान भरपाई इतर कोणाच्या खात्यावर वळवली तर जात नाही ना, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथील वनमंत्र्यांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, जावेळे येथील विजय रंगले यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा त्रास वाढत चालला आहे. आमच्या जनावरांचे मोठे नुकसान झाले; परंतु, अजूनही कोणती ठोस कारवाई झालेली नाही. वनविभागाचे अधिकारी येतात, फोटो काढून जातात; मात्र ना पंचनामा, ना नुकसान भरपाई. आम्ही नेमकं कुणाकडे दाद मागायची? प्रशासनाने आता तरी जागे होऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय
