1990 च्या उदारीकरणानंतर आपला मूळ व्यवसाय सोडून विविध क्षेत्रात विस्तार करण्याची एक लाट आली. या कंपन्यांचे व मालकांचे मोठे नाव होतेच. शेअर बाजारही तेजीत होता. त्यामुळे त्यांनी काढलेल्या नवनव्या कंपन्यांना बाजाराने उचलून धरले. एका क्षेत्रात यशस्वी झालेले असल्याने हे उद्योगपती लाथ मारतील तिथे पाणी काढतील असाच सर्वांचा होरा होता. तिथून जवळपास वीस वर्षे अशी गेली. 2008 मधील मंदीमुळे यातील बर्याच जणांचे पितळ उघडे पडले. काही जण तर त्याहीपूर्वीच धंद्यातून उठले. टाटा आणि बिर्ला हे देशातले सर्वात बडे भांडवलदार. पैसा, माणसं, तंत्रज्ञान या कशातच ते कमी पडण्याचे कारण नव्हते. त्यांनी एकत्र येऊन मोबाईल फोनची कंपनी काढली. पण ती बुडाली. टाटांच्या गळ्याला फास लावून ती गेली. रिलायन्सने वीजनिर्मिती, डीटीएच सेवा अशा अनेक क्षेत्रात मार खाल्ला. रुईया, महिन्द्रा, किर्लोस्कर, मित्तल, बजाज या सर्वांकडे अशाच प्रकारच्या अपयशाच्या कथा आहेत. यातील बहुतेकांकडे केवळ प्रचंड भांडवल होते. पण तंत्रज्ञान आणि नव्या युगातील बाजारपेठेचे डावपेच नव्हते. यातून अंगापेक्षा बोंगा मोठा अशी त्यांची अवस्था झाली. व्हिडिओकॉन हेदेखील याचेच ठळक उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांपासून कंपनीची वेगाने घसरण झाली. सोमवारी मालक वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने सोमवारी चंदा कोचर प्रकरणात अटक केली. व्हिडिओकॉन ही मराठी कंपनी आहे. धूत हे मूळचे औरंगाबादचे. मारवाडी असले तरी महाराष्ट्रात पिढ्या गेल्या असे हे घराणे. नंदलाल माधवलाल धूत यांनी 1984 मध्ये तिची स्थापना केली. ते मुळात एका साखर कारखान्याचे मालक होते. बजाज ऑटोची मोठी डीलरशिपही त्यांच्यापाशी होती. म्हणजे तेव्हापासूनच धंद्याचे कौशल्य आहे या बळावर ते वेगवेगळ्या क्षेत्रात घुसू लागले होते. उदारीकरणानंतर टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह अशा साधनांची मागणी प्रचंड वाढली. व्हिडिओकॉनने 1999 मध्ये फिलिप्सचा रंगीत टीव्ही बनवण्याचा कारखाना खरेदी केला. त्यानंतर त्यांनी कंपन्या खरेदी करण्याचा धडाकाच लावला. रंगीत टीव्ही ट्यूब क्षेत्रातील जगात सर्वात बडी मानली जाणारी थॉम्पसन, केल्विनेटर, कोरियाची देवू अशांना कबजात घेतले. 2005 च्या सुमाराला व्हिडिओकॉन ही जगातील तिसर्या क्रमांकाची मोठी टीव्ही उत्पादक कंपनी बनली. शिवाय रंगीत टीव्ही ट्यूबची सर्वात मोठी पुरवठादार. यामुळे टीव्ही कोणताही असो त्यात कलर ट्यूब व्हिडिओकॉनची असेल अशी एकेकाळी स्थिती होती. सॅमसंग कंपनीचा भारतातील प्रवेशही व्हिडिओकॉनच्या खांद्यावरूनच झाला. या कंपन्यांच्या जोरावर त्यांच्याकडे पैसे आले आणि प्रचंड भांडवल उभारण्याची शक्तीदेखील. पण या शक्तीनेच त्यांचा घात केला. त्याच दरम्यान केंद्र सरकारने क्रूड तेल व गॅस उत्खननासाठी कंपन्यांना निमंत्रण दिले. या क्षेत्रातील सुरुवातीची भांडवली गुंतवणूक प्रचंड आणि विहिरी खोदून तेल व गॅस हाती लागला नाही तर पैसे बुडण्याचा मोठा धोका. पण धूत यांनी भारतातच नव्हे तर ब्राझील, मोझाम्बिक, इंडोनेशिया अशा देशांमध्येही तेल विहिरी खरीदल्या. याच दरम्यान मनमोहनसिंग सरकारने मोबाईल व दूरसंचार सेवेच्या परवान्यांचा लिलाव केला. व्हिडिओकॉनने तोही परवाना मिळवला. त्यांनी एक आयपीएल संघही खरीदला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही ते घुसले. विशेष म्हणजे, अंबानींची रिलायन्स ही देखील नेमक्या याच क्षेत्रांमध्ये व्यवसाय उघडून बसली होती. याचा एक अर्थ असा होता की, या स्पर्धेत टिकणे हे सोपे नव्हते. इथूनच धूत यांच्या र्हासाला प्रारंभ झाला. तेलक्षेत्रातून त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही. त्यांची कंपनी कर्जसापळ्यात अडकली. यातून दूरसंचार कंपनी एअरटेलला, तेल कंपन्या ओएनजीसीला देऊन टाकाव्या लागल्या. कंपनीचं दिवाळं निघालं. आणि आता आयसीआयसीआयकडून कर्ज घेण्यापोटी कमिशन म्हणून चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीला पैसे दिल्याचा आरोप धूत यांच्यावर झाला आहे. कोचर आणि धूत यांच्याविरुध्दच्या या प्रकरणाची चौकशी 2018 सालापासून चालू आहे. मात्र त्यांना अटक आता झाली आहे. अर्थात, पकडला गेला तो चोर अशी इथली स्थिती आहे. पकडले न गेलेले असंख्य धूत बडे आणि यशस्वी म्हणून मिरवत आहेत.






