| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील हिंदी विषयातील पहिल्या पीएच.डी. डॉ. अनुपमा दिलीप धनावडे, रा. पेण यांना नुकतीच देवाज्ञा झाली. निधनसमयी त्या 66 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
‘साठोत्तरी नाटकों मे नारी चित्रण’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, कोल्हापूर संचालित डॉ. पतंगराव कदम आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज, पेण येथे त्यांनी प्राचार्या म्हणून अनेक वर्षे कारभार पाहिला. मुंबईपेक्षा पेणमध्येच पी.एच.डी. शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पतंगराव कॉलेजमध्ये एम.ए आणि पी.एच.डी. शिक्षण केंद्र सुरु करण्यात त्यांना यश आले होते. पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणूनसुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून रायगडमधील अनेक तरुण-तरुणींना त्यांनी मार्गदर्शन केले होते.
त्यांच्या बहुमूल्य शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षिका, शिक्षक रत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. अधुनातन विधा:वैविध्य आणि साठोत्तरी हिंदी नाटक नारी-चित्रण अशी त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत. त्यांच्या पश्चात पती दिलीप धनावडे निवृत्त जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, मुलगी दीप्ती आणि मुलगा वैभव धनावडे असा परिवार आहे.






