अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये ठरले देवदूत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वैद्यकीय क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणारे अलिबागमधील डॉ.चंद्रशेखर साठ्ये यांनी वृध्द प्रवाशाचे प्राण वाचविले आहेत. पॅरिसहून मुंबई असा विमानातून प्रवास होत असताना साडेतीन हजार फुट उंचीवरील विमानात बेशुध्द पडलेल्या रुग्णावर मर्यादीत वैद्यकीय साधनांच्या मदतीने उपचार करून जीवनदान दिले. डॉ. साठ्ये त्या रुग्णासाठी देवदूत ठरले असून वैद्यकिय सेवेसाठी देऊ केलेली आर्थिक मदतदेखील डॉक्टरांनी नाकारली. त्यांच्या या सेवेमुळे माणुसकीचे दर्शन प्राप्त झाले. वैद्यकीय कौशल्य, समयसुचकता आणि मर्यादीत वैद्यकीय साधनांचा अचूक वापर करून डॉ. साठ्ये यांनी वैद्यकीय सेवेतून मदतीचा हात दिला. अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये हे वैद्यकिय क्षेत्रात गेल्या 28 वर्षापासून कार्यरत आहे. अस्थिरोग तज्ञ म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी वैद्यकिय क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. साठ्ये हे सात ऑक्टोबरला अमेरीका दौऱ्यावर होते. न्यूयॉर्कवरून ते पॅरीसला पोहोचले होते. मात्र, पॅरीसवरून मुंबईला येणारे कनेक्टीग फ्लाईट चुकल्याने, त्यांना एक दिवस पॅरीसमध्ये रहावे लागले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पॅरीसवरून मुंबईला येणाऱ्या विमानात त्यांना तिकीट देण्यात आले. डॉ. साठ्ये पॅरीसहून एअर फ्रान्सच्या (एफ) विमानाने मुंबईला येत होते. परतीच्या प्रवासात असतांना उड्डाण केल्यानंतर काही वेळाने विमान 35 हजार फुट उंचीवर पोहचले. दरम्यान, सुमारे चार तासांनी विमानातील एका 75 वर्षीय वृध्दाची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुध्द अवस्थेत आसनावर पडून होते. ही बाब विमानात असलेले डॉ. साठ्ये यांच्या निदर्शनास आली. क्षणाचाही विलंब न करता ते वृध्दाच्या मदतीसाठी धावून गेले.

बेशुध्द अवस्थेत असलेले वयोवृध्द कुठलाही प्रतिसाद देत नव्हते. रक्तदाब कमी होत चालला होता. त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर होती. विमानातील मर्यादीत साधनांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार सुरु केले. त्यानंतर काही वेळातच व्यक्ती शुध्दीवर आले. नंतर तासाभराने त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी पुन्हा उपचार केल्यावर वृध्द व्यक्तीची प्रकृती स्थीर झाली. त्यानंतर मुंबईत विमान पोहोचण्याच्या तयारीत असतांना वृध्द व्यक्तीची परत, प्रकृती खालावली. विमानातील कीटमध्ये उपलब्ध औषधांचा वापर करून डॉक्टरांनी वृध्दाचे प्राण वाचवण्यात मदत केली. मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांना विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे डॉ. साठ्ये हे वयोवृध्द प्रवाशांसाठी देवदूत ठरले. डॉ. साठ्ये यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक होत आहे.

नातेवाईकांकडून आभार
पॅरीसहून मुंबईला निघालेले प्रवासी हे मुंबईतील रहिवासी असून ते कफ परेड येथे राहत आहते. त्या वृध्द व्यक्तीच्या मदतीचा वेळीच धावून गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. डॉ. साठ्ये यांचे नातेवाईकांकडून आभार मानले.
Exit mobile version