। चिपळूण । प्रतिनिधी ।
ज्येेष्ठ निरुपणकार महाराष्ट्रभुषण डॉ. श्री. नानासाहेब तथा नारायण धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग जि. रायगड यांच्या मार्फत व पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्ते दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान हाती घेतले आहे.
या दत्तक रस्त्यांपैकी चिपळूण शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस आणि अर्बन बँक ते भेंडी नाका असे प्रत्येकी साधारणतः चार किमीचे दोन रस्ते प्रतिष्ठानने दत्तक घेतले आहेत. यावेळी या दोन रस्त्यांवर दुतर्फा असणारा कचरा, गवत,बाटल्या, झाडी,प्लॅस्टिक हटविण्यासाठी श्री सदस्यांचे शेकडो हात सरसावले. यावेळी गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी नगरपालिकेने गाडीची व्यवस्था करून दिली होती.बघता बघता हे दोन्ही रस्ते स्वच्छ आणि साफ झाल्याचे दिसून आले.
या रस्ते दत्तक अभियान मध्ये चिपळूण शहरातील 131 सदस्यांनी ओला 5.6 टन आणि सुका 0.2 टन असा कचरा गोळा करून नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकण्यात आला.डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, वुक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खत निर्मिती, बंधारे निर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. त्यापैकी एक रस्ते दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान घेण्याचे आले आहे.या अभियानात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येणार आहेत. यावेळी नागरिकांनी प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.