| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
‘अमर रहे…, अमर रहे…, मनमोहन सिंग अमर रहे…’च्या घोषणांनी जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर शनिवारी दुपारी 1 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री मनीष गोबिन हेदेखील निगम बोध घाटावर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
देशाचे 14 वे पंतप्रधान डॉ. सिंग यांचे गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव शुक्रवारी दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. यानंतर डॉ. सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता नेण्यात आले. काँग्रेस मुख्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर निगम बोध घाटावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सर्वांना अश्रू अनावर
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी एका विशिष्ट प्रोटोकॉलचेही पालन करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवण्यात आला होता. त्यासोबतच अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी उपस्थितीत असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले.






